आदिवासी परंपरेतील लग्नगीते
आदिवासी
समाजामध्ये तीन प्रकारचे विधी जीवनामध्ये केले जातात. जन्मच्या वेळी पाचवी पुंजने,
दुसरा लग्न करणे, तिसरा अंत्यविधी म्हणजेच मृत्यूनंतर दहावा, तेरावा केला जातो.
यापैकीच लग्न हा आदिवासी लोकांच्या जीवनातील महत्वाचा प्रसंग आहे. मुले- मुली वयात
आली की त्यांच्या विवाहाची तयारी केली जाते.
आदिवासी लग्नात
अजून लग्नगीते हि तोंडी स्वरूपातच म्हटली
जातात. त्याच्या लग्नाचे कार्यक्रम तीन दिवस चालतात. यात परंपरेने चालत आलेले अनेक
उपक्रम केले जातात. लग्नाची खरी सुरुवात हि हळद फोडणे येथून सुरु होते. हळद
फोडतांना ती कुवाऱ्या मुलींनीच फोडावी अशी रीत आहे. तसेच या उपक्रमात स्त्रियाच
असतात. यात कुणीच पुरुष सहभागी नसतो. हळद फोडणे झाल्यानंतर हळद लावणे हा उपक्रम
असतो. हा उपक्रम लग्नाच्या एक दिवस अगोदर होतो. यात नवरीला तिच्या घरी व नवरदेवाला
त्याच्याच घरी हळद लावण्याचा कार्यक्रम होतो. त्यानंतर त्याच दिवशी सायंकाळी
तेलवणाचा कार्यक्रम असतो. यात घरात उखळ असतो. तेथे कांबळा अंथरून त्यावर चौरंगपाट
ठेवला जातो. व नवरीला त्यावर बसवले जाते. आणि सर्व पंच मिळून नवरीला बाशिंग बांधले
जाते. त्यानंतर नवरीच्या हाताने पहिल्यांदा पाच स्त्रियांना घुगऱ्या वाटल्या
जातात. घुगऱ्या म्हणजे हरभरा व तुरीचे दाने हे उकडवून सर्वांना वाटले जाते. अशा
प्रकारे तेलवणाचा कार्यक्रम पार पडतो.
लग्नाच्या दिवशी सकाळी
देवका घेऊन जाण्याचा कार्यक्रम असतो. शेवटी लग्न समारंभ पार पडल्यानंतर नवरीला
सासरी पाठविण्याचा कार्यक्रम असतो. हा क्षण अतिशय दुःखाचा पण तितकाच आनंदाचा असतो.
ह्या सर्व कार्यक्रमात वेगवेगळी गीते गायली जातात. आदिवासी लोकांमध्ये अजूनही हि
गीते मौखिक पद्धतीनेच म्हणतात.
हळद फोडणे –
हळद फोडण्याचा
कार्यक्रम हा लग्न विधीमधील सुरवातीचा असतो. त्यापासुनच लग्नकार्याला सुरवात होते.
आदिवासी समाजात लोकगीतात स्त्रियांच्या गीतांची संख्या जास्त आहे. आदिवासी
लोकांच्या या गीतांची परंपरा मौखिक आहे.
लग्नप्रसंगी हळद फोडताना म्हटली जाणारी गीते
दारी करुंदी
करुंदी तुझ पान अ .....................
दारी करुंदी करुंदी तुझ
पान ग ......................
गोनी भरील्या भरील्या
हळदीच्या अ .............
गोनी भरील्या भरील्या
हळदीच्या ग .............
नेवून लोटिल्या लोटिल्या
तोरणदारी अ ..........
नेवून लोटिल्या लोटिल्या
तोरणदारी ग ..........
या गीतातून
लग्नाच्या घरासमोर तोरण बांधले जाते आणि हळदीच्या भरलेल्या गोणी त्या लग्नघरी तोरण
दारासमोर पसरवल्या जातात आणि गाणे म्हटले जातात.
चांद मन मी
निळावंती चल जाऊ दख्यनाला
चल जाऊ दख्यनाला.....
हळदीचा योग्य आला हळदी बना ल ........
हळदी बना ल......
एकच घुड मी तोडून आणला
भावाच्या लग्नाला
भावाच्या लग्नाला ......
या गीतातून
हळदीचा योग आल्यावर हळद दूरच्या बनातून आणली जाते. त्यातून एक घुड ती तोडून आणते.
तिच्या भावाच्या लग्नासाठी. असे वर्णन केले आहे.
हळद लावणे –
लग्नविधीच्या
एक दिवस अगोदर हा हळद समारंभाचा कार्यक्रम होतो. या प्रसंगी नवरी किंवा नवरदेव
यांना आपल्या घरीच हळद लावली जाते. हळदीसाठी उखळावर बसविले जाते हळद लावणेसाठी पहिल्यांदा ज्या मुलीच्या हातून त्या नवरीची हळद
फोडली तिच्याकडूनच पहिल्यांदा हळद लावाली जाते. त्याप्रसंगी हळदीगीत म्हटली जातात.
आत्या म्हणून
टिळा कोणु देतो येय .....
येय .......
होती रामूची रामूची माय
येय ..........
येय .......
आत्या म्हणून टिळा कोणु
देतो येय .....
येय .......
होता रामूचा रामूचा बाप
येय .....
येय.....
या गीतातून हळद लावतांना नवऱ्या
मुलाच्या आई वडिलांनी पहिल्यांदा हळद लावावी असे म्हटले आहे.
पिवळा पातळ
हळदीन भरील अ .....
बाई ग लगीनाच अ ...
माय का माझी दोन दिसाची अ
....
सासू ग माझी जलयाची अ
....
पिवळा पातळ हळदीन भरील अ
.....
बाई ग लगीनाच अ ...
बाप का माझा दोन दिसाचा अ
......
सासरा ग माझा जलयाचा अ
.....
या गीतामध्ये नवरी मुलीच जे हळदी पातळ
आहे ते हळदीन पूर्ण भरून गेलं आहे आणि ती म्हणते आई वडील हे का दोन दिवसाचे असतात
आणि सासू सासरे हे जन्मभराचे असे या गीतात म्हटले आहे. म्हणजेच ह्या आदिवासी मुली
आपले माहेरचे सर्व नाते संबंध हे आपल्या सासरशी जोडून आपले नवे आयुष्य जगायला
सुरुवात करते.
निळा पातळ
पिवळा पातळ पिवळा पातळ
लगीनाच ........
सासू बाई ...... आत्या
बाई व माझी वटी भरा
निळा पातळ पिवळा पातळ
पिवळा पातळ
लगीनाच ........
नणंद बाई ..... नणंद बाई
व माझी वटी भरा
निळा
पातळ पिवळा पातळ पिवळा पातळ
लगीनाच ........
या गीतातून नवरीच जे हळदीच पातळ असत.
ते निळ्या किंवा पिवळ्या रंगाच असते आणि नवरी आपली ओटी भरण्यासाठी तिच्या सासू,
नणंद यांना बोलवत आहे, असे या गीतामध्ये म्हटले आहे.
तेलवण कार्यक्रम
हळदीच्या
दिवशीच संध्याकाळी तेलवणाचा कार्यक्रम असतो. नवरा किंवा नवरी यांच्या घरी पाटावर
बसवून पंचाच्या उपस्थितीत बाशिंग बांधतात. तेलवणाच्या कार्यक्रमात चौरंगावर नवरी
अथवा नवरदेवाला बसविले जाते. त्यावेळी ही
तेलवणाची गाणी म्हटली जातात.
तेलवण
पड तेलवण पड कोणु देवावरी
कोणु देवावरी ....
कासया वाटी कासया वाटी
लोहारी कांड लोहारी कांड
मोरया तूर मोरया तूर
तेलवण पड तेलवण पड कोणु देवावरी ...
चहुटया देवावरी
तेलवण पड तेलवण पड कोणु देवावरी ...
कोणु देवावरी .....
तेलवण पड गायी गोदणावरी ...
गायी गोदणावरी ...
या गीतातून कासाची वाटी आणि लोखंडाचा तूकडा हे दोन्ही मिळून
तेलवण पाडत असतात. तेलवण पाडताना अगोदर सर्व देवांची नावे घेतली जातात आणि
त्यानंतर नवरीच्या डोक्यावर कासाची वाटी धरून लोखंडाच्या तुकड्याने गाणे म्हणत
तेलवण पाडतात.
देवका देऊळात घेऊन जाणे -
लग्नाच्या दिवशी पिढीच्या देवांना अत्यंत
महत्वाचे स्थान दिले जाते. त्यांना सर्व गावांमध्ये मिरवले जाते, सोबत गाणे म्हटले
जाते.
तांदूळ सडता पाय लागल व पाय लागल
कोणच्या
देवाल पाय लागल व पाय लागल
मारुती
देवाल पाय लागल व पाय लागल
मारुती
देवाचं सण करजो...
तांदूळ
सडता पाय लागल व पाय लागल
कोणच्या
देवील पाय लागल व पाय लागल
भवानी
देवील पाय लागल व पाय लागल
भवानी
देवीच सण करजो..
या गाण्यातुन
देवाला नमस्कार करतांना जे तांदूळ सोडतात, त्याला पाय लागल्यामुळे काही अनर्थ नको
घडायला म्हणून त्या देवांचे सर्व सण उत्सव करायला हवे असे या गीतामध्ये म्हटले
आहे.
भुईमय करुनी उंगेली रे देवा
भुईमय
करुनी उंगेली .......
वाटेवरला
देऊळ र देऊळ अ ......
व्याहन
बसला हनुमान र हनुमान
भुईमय
करुनी उंगेली रे देवा
भुईमय
करुनी उंगेली .......
वाटेवरला
देऊळ र देऊळ अ ......
व्याहन
बसली भवानी र भवानी
व्याहन बसली भवानी
या गाण्यामध्ये देवांची मिरवणूक काढतात आणि
गावातील सर्व मंदिरातील देवांचे दर्शन घेऊन पुढे जावे, असे या गाण्यात म्हटले आहे.
देवका देऊळात घेऊन जाणे -
खरं तर लग्न झाल्यानंतर
पाठवणीचे क्षण हा अतिशय दुःखाचा असतो. कारण नवरीला आपले माहेर सोडुन सासरी जावे
लागते.
मांडवा दारी दोन केवड सीता एखली रड व .....
सीता म्हणे
मी नाय जाऊ व बहिणीला नेऊ .....
मांडवा दारी
दोन केवड सीता एखली रड व .....
बापा म्हणे
मी नाय जाऊ व संगे भावाला नेऊ.....
या गीतामध्ये मांडवाच्या
दारात दोन लहान माठ ठेवतात आणि त्याला दोऱ्यानी बांधून घेतात त्याला केवड म्हणतात.
नवरी निघतांना त्याला धरून रडत असते आणि म्हणते कि मी एकटी नाही जाणार माझ्यासोबत
भावाला किंवा बहिणीला देखील पाठवा असे या गीतामध्ये म्हटले आहे.
खिळा मोडुनी निगेलु बाहेरी
खिळा मोडुनी
निगेलु बाहेरी
बसा बसा
गुणाच्या माई व
मी त जाते
सासरवाडीला .....
माहेरवाडी
नाय माझे मनाची
सासरवाडी
जलमजूगाची .....
या गीतातून नवरी मुलगी हि
दाराची बारुंड ओलांडून निघालेली असते आणि बाहेरच्यांना म्हणते मी जाते सासरवाडीला,
कारण हि सासरवाडी आता जन्मोजन्माची माझी झाली असे या गीतामध्ये म्हटले आहे.
सध्याच्या
काळात आदिवासी संस्कृतीचा लोप पावत चाललेला दिसून येत आहे. आता लग्नामध्ये आदिवासी
गाणे म्हटले जात नाही. म्हणून आपणाला आठवण
करून देण्याचा एक प्रयत्न आहे.
Ek no mahiti
ReplyDeleteछान माहिती👍👌👌
ReplyDeleteछान माहिती👍👌👌
ReplyDeleteJay adhivasi
ReplyDeleteMast
ReplyDeleteM
tumcha nav sagu shakal ka chan blog aahe tumcha
ReplyDeleteछान माहिती आहे असा गीतांसाठी काही पुस्तक सुद्धा उपलब्ध आहेत.
ReplyDelete