महत्वाची माहिती

Tuesday, October 27, 2020

आदिवासी देव-देवता डोंगरदेव

 

आदिवासी देव-देवता डोंगरदेव सण 

डोंगरदेव

आदिवासी समाजात डोंगऱ्यादेवाला अतिशय मानाचे स्थान आहे. डोंगऱ्यादेवाला आदिवासी समाजात ‘भाया’ असेही म्हणतात. आदिवासी समाजात डोंगऱ्या देवाच्या उत्सवाची परंपरा फार पुर्वीपासून चालत आलेली आहे.  सुरगाणा, पेठ, कळवण तालुक्यातील आदिवासी भागांमध्ये डोंगऱ्यादेवाचा उत्सव दर पाच वर्षांनी साजरा केला जातो. हा उत्सव पाच ते सात किंवा कधी कधी अकरा दिवस साजरा केला जातो. हा उत्सव करतांना गावाच्या मध्यस्थानी किंवा जिथे मोकळी जागा असेल तेथे मोर पिसाचा गुच्छ उभा केला जातो. त्या ठिकाणी झेंडूची झाडे, काकडी, मोराची पिसे, देव कुरडू व इतर साहित्य ठेवून डोंगरदेव स्थापना केली जाते. डोंगऱ्यादेवाच्या हया कार्यक्रमामाध्ये कथा लावणारी एक व्यक्ती असते, त्याचबरोबर पावरी, घुंगराची काठी तसेच काही वेळा लेझिम देखिल कार्यक्रमात वापरले जातात. त्याचबरोबर आदिवासींच्या देवदेवतांची गाणी गायली जातात. डोंगऱ्यादेवाच्या उत्सवाच्या वेळी गावातील पुरूष लोक पावरीच्या तालावर गोल फेरा करून नाचतात.

 

  

डोंगरदेव गीते

डोंगऱ्यादेव उत्सवात गायिली जाणारी गाणी

नांदया बैलाची, चांदया बैलाची

झुंज झाली

नांदया बैलाची, चांदया बैलाची

झुंज झाली

धन्या उठार नारळी बाग मोडला

धन्या उठार नारळी बाग मोडला

नांदया बैलाची, चांदया बैलाची

झुंज झाली

धन्या उठार सुपारीनं बाग मोडला

धन्या उठार सुपारीन बाग मोडला.

 

डोंगऱ्यादेव उत्सवात गायिली जाणारी गाणी

काय व बोले व मेरी काय व बोले,

पावरी बोले रं मेरी पावरी

बोले !

कशी व बोले व मेरी कशी व बोले

चांगली बोले व मेरी चांगली

बोले !

 

डोंगऱ्यादेव हा उत्सव साजरा करीत असतांना गावातील लोक शेजारील गावामध्ये जाऊन प्रत्येक घरासमोर पावरीच्या तालावर गोल रिंगण करून नाचतात.  डोंगऱ्यादेवाची वेगवेगळी गाणे म्हणतात. तेव्हा तेथील ग्रामस्थ त्यांना धान्य , पीठ , तेल , मसाल्याचे पदार्थ इ. वस्तू देतात. संध्याकाळी पुन्हा घरी येवून डोंगऱ्यादेवाची कथा लावली जाते. ज्या लोकांना माऊलीचे व्रत घेतलेले असते, त्यांनी कुठेही जायचे नसते. दिवसा तीन वाजेच्या सुमारास सर्व माउल्या उत्साही नागरीक गावाजवळील डोंगरावर गड जिंकण्यासाठी जातात. त्या ठिकाणी डोंगऱ्यादेवाची विधीवत पुजा केली जाते. येथे पण रात्रीच्या वेळी रात्रभर डोंगरावर कार्यक्रम घेतला जातो. त्या जागेला ‘रानखळी’  असे म्हटले जाते.



माऊल्यांना डोंगरदेव उत्सव होईपर्यंत म्हणजे पाच, सात किंवा अकरा दिवस त्याच ठिकाणी रहावं लागतं व भोजनही तेथेच कराव लागतं. शेवटच्या दिवशी संपूर्ण गावातील जमा केलेले धान्य व फराळाच साहित्य घेऊन नदीवर जातात. व तिथे भोजन व फराळ करतात.त्या नंतर संध्याकाळी माऊल्या व लोक थोम उपटतात व गडाकडे (गौळ) जाण्यास निघतात. तेथे पूजा करून पुन्हा गावामध्ये येऊन गावाच्या धाणीवरती जाऊन त्या ठिकाणी माऊल्यांच्या अंगांतील देव उतरवले जातात. त्या ठिकाणी कोंबड बोकडाचा बळी दिला जातो व संध्याकाळी देवाचा प्रसाद म्हणून सर्व गावाला तसेच आलेल्या पाहुण्या मंडळीला भोजन दिले जातात. अशा पध्दतीने डोंगऱ्यादेव उत्सव साजरा केला जातो.

डोंगरदेवाची पूजा करण्याचे महत्व

डोंगऱ्यादेव या ग्रामदेवताची फार पुर्वीपासूनची पंरपरा असल्याने सुरगाणा तालुक्यात सर्व आदिवासी भागात डोंगऱ्यादेव उत्सव आनंदाने साजरा केला जातो. या उत्सवाला ' भाया '  असेही म्हटले जाते. गावात सुखशांती लाभावी, जंगलात शेतीची कामे करतांना निसर्गाचा कोणताही कोप  होऊ नये, तसेच शेतात पेरलेल्या पिक पाण्याची भरभराट व्हावी, घरसंसाराची भरभराट व्हावी, आदी श्रध्देपोटी निसर्गदेवतेला, डोंगऱ्यादेवाला कोंबडया, बकऱ्यांचा बळी देऊन नैवेद्य दाखवतात. या प्रकारे या ग्रामदेवतांची सुरगाणा तालुक्यात व आजुबाजूच्या परीसरात पुजा केली जाते. सर्व आदिवासी बांधव डोंगऱ्यादेव उत्सव आनंदाने साजरा करतात.

2 comments: