आदिवासी महादेव कोळी समाजाच्या देवतांची
जत्रा
घोरपडा देवी ची जत्रा
आदिवासी
समाजातील कोळी महादेव लोकांचे श्रदधास्थान असलेली ही एक जत्रा आहे. अहमदनगर मधील
अकोले तालूक्यातील प्रवरा नदीच्या तीरावर ‘रंधा’ नावाचे गांव आहे. या गावाजवळच
प्रवरा नदीच्या तीरावर ‘घोरपडा’ देवीचे मंदिर आहे. ही देवी महादेव कोळी समाजाची कुलदेवता समजली
जाते. त्याचबरोबर अकोले तालुक्यामधील साबळे कुळाची ही कुलदेवता मानली जाते. कारण
त्यांच्या देव्हाऱ्यातील देवांच्या मुर्तीवर घोरपडीची टाक आहे. तसेच परीसरातील इतर
कुळेही घोरपडा देवीला आपली कुलदेवता मानतात. यामुळेच महादेव कोळी लोक घोरपड या
प्राण्याची शिकार करीत नाही.
चैत्र
पौर्णिमेच्या दिवशी घोरपडा देवीची यात्रा असते. महाराष्ट्रातील महादेव कोळी बांधव
मोठया संख्येने या जत्रेला येतात. अकोले, पुणे मधील जुन्नर, इगतपूरी, शहापूर
तालुक्यातील लोक मोठया संख्येने यात्रेला हजेरी लावतात.
आदिवासी
माणसे यात्रेत आपले नवस फेडतात, नवस घेतला जातो. पहिलवान मंडळींसाठी कुस्त्यांचा
आखाडा यात्रेत भरविला जातो. देवीजवळच मोठी यात्रा भरते. महादेव कोळी लोक या
देवीजवळ लहान मुलांचे ‘जावळ’ देतात.
यासाठी कोंबडाचा किंवा बोकडाचा बळी दिला जातो. आपली मुले ही घोरपडी सारखी काटक
व्हावी. उन, वारा, पाऊस यांना तोंड देता यावे, रानावनांत सहज भटकता यावे या साठी
ते घोरपडा देवीला जावळ देऊन आपली इच्छा व्यक्त करतात.
घोरपडा
देवीला नैवदय दाखविला जातो. घोरपडा देवी
आपल्या आदिवासी लोकांचे रक्षण करते. गावावर कोणत्याही प्रकारचे संकट येऊ नये
म्हणून रंधा गावातील लोक जत्रेनंतर येणाऱ्या दर मंगळवारी व पुढील पाच मंगळवार
संपेपर्यंत त्या संपुर्ण गावात कोणत्याही प्रकारचा रक्तपात करीत नाहीत. या
कालावधीत कोणत्याही प्राण्याचा बळी दिला जात नाही. साधारण सव्वा महिना हे व्रत दरवर्षी पाळले जाते. अशा प्रकारे घोरपडा
देवीची यात्रा भरते.
वरसूबाईची जत्रा
आदिवासी
समाजातील महादेव कोळी समाजाची कुलदैवत म्हणून वरसूबाई देवीला मानले जाते. पुणे जिल्हयातील जुन्नर आणि आंबेगाव
तालुक्याच्या सरहददीवर एक उंच डोंगर आहे. या डोंगरावर वरसूबाईचे मंदिर आहे.
वरसूबाई देवी हि महादेव कोळी समाजाची कुलदैवत आहे. सर्व महाराष्ट्रातील महादेव
कोळी लोक या कुलदैवताच्या दर्शनासाठी गर्दी करतात. चैत्र महिन्यातील तिसऱ्या
मंगळवारी वरसूबाईच्या देवीची मोठी जत्रा भरते. या देवीचे मुळ ठाणे आडे-तोरणे ता
खेड येथ आहे.
यात्रेच्या
दिवशी पायथ्याला देवीला कोंबडे, बकऱ्यांचा बळी देऊन नवस फेडला जातो. तर डोंगरावरील
देवीला कोंबडया बकरे जिवंत सोडले जातात. त्याला लोक जाणे-सोडणे असे म्हणतात. हे
दैवत अत्यंत जागृत स्वरूपाचे मानले जाते. लग्नानंतर नवदांम्पत्य या देवीच्या दर्शनाला आवर्जून जातात. एकदा तरी
देवीच्या दर्शनाला जावे असे मानले जाते. महादेव कोळी लोकांची या देवीवर खुप
श्रध्दा असून जवळपास असलेल्या बारा गावांवर ही देवी लक्ष ठेवून असते असे सांगतात. जवळपासच्या
गावातील लोक कामाला निघतांना देवीकडे नजर टाकून भरोसा ठेवून कामाला जातात. अशा
प्रकारे वरसूबाई देवीचा महादेव कोळी लोकांच्या पाठीशी आशिर्वाद आहे.
दऱ्याबाईची जत्रा
पुणे
जिल्हयातील जुन्नर तालुक्यामध्ये चिल्हेवाडी गावाजवळ मांडवा नदीवर दऱ्याबाईचे
मंदिर आहे. महादेव कोळी लोकांची या देवीवर खूप श्रध्दा आहे. ही देवी कोळी लोकांना
येणाऱ्या संकटांची पूर्वसूचना देते असे लोक मानतात. दऱ्याबाई देवीची जत्रा माघ
महिन्यात पौर्णिमेला भरते. संकटांची
पूर्वसूचना मिळावी म्हणून पौष पौर्णिमेला शिजविलेल्या भाताचा नैवदय एका दिड फुट
खडडयात पुरून ठेवतात. तो नैवदय तेथिल भगत पुरतो
त्यासाठी प्रथम पळसाची दोन मोठी पाने घेतो. त्यावर नैवदय ठेवतो. त्यावर दुसरी दोन
पाने झाकण म्हणून ठेवतो. हे सर्व गुंडाळून खोल खडडयात पुरले जाते. हे सर्व करतांना
भगताच्या अंगात देवी संचारते.
मांडवा
नदीवरील असलेल्या मंदिरापासून पश्चिमेकडे एक किमी अंतरावर एक खोल डोह आहे. त्या
डोहाला हाळवंडीचा डोह म्हणतात. एक महिन्यानंतर माघ पौर्णिमेला म्हणजेच जत्रेच्या दिवशी दुपारी
चार वाजता तोच भगत हाळवंडीच्या डोहावर अंघोळ करतो. अंघोळ झाल्यावर हातात घंटा घेऊन
तो नदीपात्रातुन दगडगोटयांमधून धावत निघतो. त्याच्या अंगात त्यावेळी देवी
संचारलेली असते. त्याच्या सोबत इतर भगत व काही लोक धावत असतात. त्यांच्या हातात
मोरपिसांचा जुडगा असतो. भगत कुठेही न थांबता देवीजवळ येऊन तिचे दर्शन घेतो व
नैवदयाच्या दिशेने धावत जातो. नैवदय ज्या
ठिकाणी पुरलेला असतो त्या जागेवर तो आपल्या हाताने उकरायला सुरवात करतो. त्यावेळी
यात्रेतील लोक त्या ठिकाणी मोठी गर्दी करतात. साधारण दहा मिनीटांमध्ये तो नैवदय
बाहेर काढला जातो. तो नैवदय ज्या दिशेला खराब झाला असेल त्या दिशेला रोगराई,
दुष्काळ व नैसर्गिक आपत्ती येईल असा लोक
अर्थ घेतात. संपुर्ण नैवदयच खराब निघाला
तर आदिवासी महादेव कोळी समाजच मोठया संकटात आहे असे मानले जाते.
येथिल
हाळवंडीचा डोह अतिशय पवित्र आहे. यालाच देवडोह असे मानले जाते. सर्व यात्रेकरू या
देवडोहात अंघोळ करतात. देवडोहाचे पाणी अतिशय थंड असते. डोहात अंघोळ केल्याने खरूज
नायटा हे आजार नाहीसे होतात. त्याचबरोबर हा देवडोह खुप खोल असून त्यात कुणीही
बुडालेले नाही असे लोक सांगतात. पूर्वी या डोहामधून जत्रेच्या दिवशी भांडी निघत
होती. ती भांडी घेऊन सर्वजण देवीचा प्रसाद घेत असत व पून्हा स्वच्छ धुवून डोहात
सोडत असत. परंतू एकदा एका बाईने वाटी चोरून नेली तेव्हापासून भांडी निघत नाही. असे
येथिल लोक सांगतात. तसेच या डोहातील मासे पकडले जात नाहीत. त्यांना देवमासे असे
म्हणतात. यावरूनच या देवीवर महादेव कोळी लोकांचा खुपच विश्वास आहे. सध्या हे देवस्थान
चिल्हेवाडी धरणात बुडालेले असून धरणाच्या भिंतीजवळ देवीची स्थापना केली आहे. त्याच
ठिकाणी ही यात्रा भरते.
Jaymataji ghorpadi
ReplyDelete