कोकणा - आदिवासी जमातीमधील विधी जन्म,
लग्न, मृत्यू
भारतीय
संस्कृतीमध्ये संस्कारांचे महत्व अनन्यसाधारण आहे. त्यापैकी काही संस्कार
श्रध्दापूर्ण भावाने पाळले जातात. आदिवासी मध्ये कोकणा, महादेव कोळी, वारली या
समाजामधील संस्कारांमध्ये बहूतेक साम्य असते. या जमामीत जन्माच्या वेळी पाचवी पुंजली जाते.
लग्नविधी तसेच मृत्यूच्या वेळी दहन, दफण विधी, दशक्रिया (दहावा) विधी या सर्व
विधींना आदिवासींच्या जीवनात महत्वाचे स्थान आहे.
जन्म
– (पाचवी)
कोकणा आदिवासी
जमातीमधील लोक हे भोळे, दैववादी, श्रध्दाळू आहेत. आदिवासी समाज हा शिक्षणाच्या
दृष्टीने मागासलेला आहे. मूल होणे ही देवाची देणगीच अशी आदिवासी लोकांची धारणा आहे. आदिवासी समाजाच्या बाबतीत बाळाचा जन्म ही गोष्ट
पुर्णपणे नैसर्गिक आहे. त्यांच्यामते
त्यासाठी कुठल्याही दवाखान्यात जाण्याची गरज नाही. घरातच नैसर्गिक पध्दतीने बाळंतपण
केले जाते. या साठी गावातील दायीन अथवा सुईन पारंपारीक पदधतीने बाळंतपण करते.
कोकणा
जमातीमध्ये मुलगा झाला तर तीन दिवसांनी आणि मुलगी झाली तर पाच दिवसांनी पाचवी
पूजन्याची प्रथा आहे. ही पाचवी पूजन्याची प्रथा अथवा विधी पूर्वपार चालत आलेला
आहे. या पूजनालाच सटवाईची पूजा असेही म्हणतात. पाचवीली हळद, कुंकू, सव्वा रूपया,
सात प्रकारचे धान्य या वस्तू खडडयात टाकून
ही पाचवी पूंजली जाते. मोहाची दारू या दिवशी लागतेच.
या दिवशी सटवाई
बाळाचे भविष्य कपाळावर लिहून जाते. ती पूढीलप्रमाणे म्हटली जाते.
ही पूजा
संपल्यानंतर बाळ व बाळंतीणीला अंगणात आणले जाते. ही बाळंतीण भूमाता, सूर्य, चंद्र
या देवांना नमस्कार करून जागेवर बसते. पाच पावले चालणे म्हणजेच बाळाची पाचवी
पूंजने ही आजही संस्कृती आदिवासी कोकणा, कोळी महादेव, वारली जमातीमध्ये आढळते.
अकरा दिवस पूर्ण झाल्यावर बाळाचे बारशी च्या दिवशी
नामकरण केले जाते. साधारण एक वर्षाच्या आत बाळाचे जावळ काढले जाते. या
दिवशी जवळील महिला, जवळचे नातेवाईक यांना आमंत्रण दिले जाते. सुईन पिंपळाच्या
पानाची टोपी बनवून त्यामध्ये कापूस व हरळी टाकून सजविते. या वेळी तुर व घुगऱ्यांचा
बेत असतो. महिला व इतर नातेवाईकांसाठी दारू व जेवणाचा बेत असतो.
बाळाचे नामकरण झालेनंतर निसर्गामध्ये,
अंगाखादयावर त्याची वाढ होते. गुरे चारणे, शेतीकामात मदत करणे, रानभाज्या, रानकंद
शोधणे, नदीत पोहणे या मध्ये ही मुले मोठी होतात. मुली झंपर, परकर घालून आरश्यात
बघून नटटापटटा करतात.
पुऐ आई-बापाच्या लग्नासाठी हालचाली
सूरू होतात. आई-वडीलांच्या संगनमताने विवाहाचे नियोजन होते.
विवाह
– (लग्न)
कोकणा आदिवासी
जमातीमधील लोकांच्या जीवनातील विवाह हा महत्वाचा विधी आहे. जीवनातील हे प्रसंग
आदिवासी लोकांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहेत. मुले-मुली वयात आल्यावर विवाह
होतात. विवाहाच्या माध्यमातून व्यक्तिची शारीरिक व मानसिक गरज भागविली जाते. अखंडित
समाजजीवन तसेच वंश सातत्य राखण्याचे महत्वाचे काम विवाहसंस्था करते. कोकणा
जमातीमध्ये एकच गोत्र तसेच एकाच कुळात विवाह होत नाही. तसेच भिन्न कुळ देखिल त्यांचे
रक्तसंबधी नाते जपतात. यामुळे अशा सहसंबधी कुळांमध्ये विवाहसंबध अमान्य असतो.
विवाहामूळे वधू
व वर यांच्यामधील नातेसंबध कायमस्वरूपी दृढ होतात. गावातील संबध, कुळसंबध, दोन
घराणी यामध्ये कायमचे संबध बांधले जातात. असे अनेंक वैशिष्टे आदिवासी जमातीमध्ये
आढळतात.
यामध्ये मुलगी
पाहणे आणि मागणी घालणे हे महत्वाचे भाग आहेत. प्रथम नवरदेवाकडील मंडळी मुलगी पसंत करतात. त्यानंतर मागणी घालण्याचा कार्यक्रम होतो. या
जमातीमध्ये पैश्यापेक्षा कष्टाला जास्त महत्व आहे. वाजंत्री आणि पंचाच्या साक्षीने
मुलीची पाच सुवासिनी कुंकू लावून तीची ओटी
भरतात. आदिवासी जमात कोकणा यांचे प्रथेप्रमोण मागणं विधीलाच कुंकूमागणं किंवा
पेनभरणे असे म्हणतात. सर्वसामान्य भाषेत साखरपूडा असे म्हणता येईल. दोन्ही कुटूंबातील सदस्यांच्या संमतीने विवाहाची
तारीख निश्चित केली जाते.
विवाह जवळ
येताच काही दिवस अगोदर देव खेळवणे म्हणजेच तळी भरणे, मांडव सुतने, हळद फोडणे, घान
सुतने इत्यादी विधी पार पडतात. विवाह मुहूर्ताच्या दोन दिवस अगोदर ढाके वाजवून मृत
पूर्वजांची पूजा केली जाते.
विवाहाच्या
अगोदरच्या दिवशी हळद विधीचा कार्यक्रम असतो. यामध्ये धवळगाणे स्त्रीयांकडून म्हटले
जाते.
तेलवण
पाडण्याचा विधी हळदीच्या संध्याकाळी असतो.
यामध्ये गहू, तूर यांच्या घुगऱ्या वाटप केले जाते. रात्री सांबळ या वादयावर
नाचगाणाच्या कार्यक्रम असतो. नाचगाण्यामध्ये नवरा अथवा नवरीला खांदयावर उचलून
नाचविले जाते. नाचविणारास नाचण्यास उत्साह यावा या साठी मोहाची दारू पिण्यास दिली
जाते. आदिवासी जमातीमध्ये विवाह सोहळा हा वधूच्या घरी पार पडतो. लग्नाच्या दिवशी
पहाटपासूनच धवपळ सूरू होते. वधू वराला उंबराच्या पाटावर बसवून अंघोळा घातली जाते.
नवरदेव कपडे घालून सजविला जातो. नवरदेव हा वऱ्हाडी घेऊन नवरीच्या गावाला जातो.
वधूच्या गावात पोहचल्याव नवरदेवाला गाडीतून उतरविण्याचा विधी पूजा करून केला जातो.
नवरदेवाला प्रथम वधूच्या गावातील मारूती मंदिरात बसविले जाते. मंदिरातून वधूच्या
घरी जाऊन वधू पाहण्याचा कार्यक्रम पार पडतो. शेवंती, कळशी नृत्यप्रकार यामध्ये होतात. काही
विवाह प्रसंगी होडीनृत्य घोडा नाचविला जातो. नवरदेवाला विवाह मंडपापर्यंत आणले
जाते. फुईशीट देऊन वधू वर यांचे मामा घेऊन मंडपात पोहचतात. मुहूर्तावर ब्राम्हण
मंगलाष्टका म्हणून लग्न लावतो. वऱ्हाडी मंडळींना जेवणाची सूचना दिली जाते. विवाहामध्ये कन्यादान, इतर विधी पार
पडतात. मामाशेला, पैसे खेळण्याचा, सुपारी पळवण्याचा खेळ सूरू होतो. नातेवाईक मंडळी
वेशीपर्यंत वधू-वरांना बोळावत येते.
ऐकमेकांचा निरोप घेऊन वऱ्हाडी मंडळी वराच्या गावाकडे येते. नवरदेवाच्या घरी
रात्री वरातीचा कार्यक्रम असतो. स्त्री पुरूष, हौशी मंडळी वादयाच्या तालाबरोबर
मोहाच्या दारूची पण सोय असते. या
नृत्यांमधून चार पिढयांचे दर्शन येथे होते. ही मंडळी तासनतास, बेभान होऊन नाचतात.
रात्री शिकारनृत्य, चारणनृत्य , खापऱ्याचोर ही सोंगे काढून वरातीचा आनंद वाढतो. या
नाचगाण्यामध्ये पहाट केव्हा होते हे कळतच नाही. पहाटे वधू –वर घरात घेण्याचा
कार्यक्रम होतो. याला घरभरणीचा कार्यक्रम म्हणतात. मंडवळया व बाशिंग विधीपूर्वक
उतरवले जातात.
धामिक
कार्यक्रम आटोपल्यानंतर नववधूला वानोळा देऊन माहेरी पाठवले जाते. पूर्वी आठवडाभर चालणारा विवाहसोहळा
हा दोन दिवसांमध्येच उरकला जातो. इतर जमातींप्रमाणे अनेक विधींना फाटा देऊन हा
विवाह लवकर उरकला जातो. कोकणा या आदिवासी जमातीमध्ये गंधर्व विवाह, बहूपत्नीत्व,
सहपलायन विवाह हे अपवादात्मक होतात. विवाहानंतर पती-पत्नीमध्ये काही वैवाहिक जीवनात वितुष्ट
निर्माण झाल्यास काडीमोड अन्यथा फारकत घेतली जाते.
मृत्यू
–
मृत्यू हा अटळ
आहे, सृष्टीचा नियमच आहे की जन्म झाला की कालांतराने मृत्यू हा होणारच. आदिवासी जमात कोकणा जमातीतही मृत्यू झालेल्या
व्यक्तीचे प्रेत पूरण्याची अथवा दहण (जाळणे) ची प्रथा आहे. मृत्यू झालेल्या
व्यक्तीच्या वस्तू विसाव्याजवळ नेऊन टाकण्याची प्रथा कोकणा जमातीमध्ये आढळते. मृताचे
स्मारक उभारले जाते, त्याला ईर असे म्हणतात. मृत्यूच्या दुसऱ्या दिवशी आदिवासी
भागात कर धरली जाते. करीच्या दिवशी कामधंदा बंद ठेवला जातो. मृत्यू झालेल्या
व्यक्तीच्या घरातील मंडळी दु:खी असते. त्यामुळे शेजारील लोक दोन चार दिवस त्यांना
घरी जेवणासाठी घेऊन जातात. यातून दु:ख विसरले जाते, तसेच माणूसकीचे दर्शनही होते.
मृत्यूच्या तिसऱ्या दिवशी स्मशानभूमीत राख भरून गोळा केली जाते. या दिवशी बाबू
पासून अर्धवट विणलेली लहान टोपली, मडक्यात शिजवलेला भात, बांबू व एरंडाच्या
नळयांमध्ये दुध, गोमतेल, कालवलेली हळद, दारू, पाणी इत्यादी विसाव्याच्या जागेवर
ठेवतात. सोबत टोपली, सूप, शिराई या वस्तू तोडूण ठेवतात.
दहावा (
दशक्रिया विधी) हा दहा दिवसांनी केला जातो. दहाव्याच्या अगोदरच्या दिवशी मृताच्या
नावाने विधीवत पूजा करून थाळगांण, भजन गायनाचा कार्यक्रम केला जातो. दहाव्याच्या
दिवशी नदीवर जाऊन केस व दाढी मृताच्या नावाने दान केली जाते. रानगवरी लावून भात शिजवला जातो. नदीवर पिंड तयार करून
त्याला पाणी सोडून पूजा करतात. नदीवर कावळयाला नैवदय दाखवितात. कावळयाने नैवदयाचे
ग्रहण केले की, मृताचे नातेवाईक घरी एकत्र येतात.
दुखवटा देण्याची
प्रथा पार पडते. या मध्ये आलेले नातेवाईक, परिचित टॉवेल, टोपी, कपडे, पैसे या स्वरूपात
मृत व्यक्तीच्या नातेवाईकांना मदत करतात. जमा झालेले कपडे संबधित मृत व्यक्तींच्या
अंगावर पाचपंचात टाकले जातात. या नंतर सामुदायिकरित्या मृताच्या नावाने आगारी
पाडण्यात येते.
अशा प्रकारे आदिवासी
जमातींमध्ये विधी आढळतात.
कोकणा जमात हिंदू आहे.
ReplyDeleteJay adivashi
ReplyDelete