महत्वाची माहिती

Monday, October 12, 2020

पगडी फाळा – आदिवासी परंपरा

 

पगडी फाळा – आदिवासी परंपरा

 

पगडी फाळा

आदिवासी भागामध्ये गावात एखादया कुटूंबातील व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्या मृतदेहावर आदिवासी परंपरेनूसार अग्णिदहन अथवा भूईडाग (जमीनीमध्ये पुरने) देऊन अंत्यविधी केला जातो. अत्यविधीची प्रक्रिया पूर्ण झाली की, लगेचच गावकरी नदीवर हातपाय धूवून एका ठिकाणी जमतात. त्या ठिकाणी एक टॉवेल अंथरला जातो. त्या टॉवेलवर पैसे टाकून मृत व्यक्तीच्या कुटूंबास मदत केली जाते. या रितीरिवाजास पगडी फाळा असे म्हणतात. गावातील व्यक्ती सधन अथवा गरीब असला तरी ही जमा केलेली मदत प्रत्येकाला स्विकारावी लागते.

 


पगडी फाळा परंपरा

नाशिक जिल्हयाच्या आदिवासी भागात ही परंपरा आजही अस्तित्वात आहे. नाशिक जिल्हयास लागून असलेल्या गुजरात मधील डांग भागाबरोबरच सुरगाणा तालूक्यातील पिंपळसोंड, पांगारणे तसेच इतर गावांमध्ये ही परंपरा शेकडो वर्षापासून चालत आली आहे. फाळा याचा अर्थ मदत अथचा वर्गणी असा होतो. माणूसकीचे दर्शन हया परंपरेतून बघायला मिळते. याचप्रमाणे चांगल्या रूढीपरंपरा आजही आदिवासी भागात जपल्या आहेत.

आदिवासी समाजाची ओळखच निसर्गाशी सलोख्याची आहे. सामाजिक जीवन, आदराने वागणे, चालीरिती, रूढी-परंपरा हया आदिवासी समाजास वेगळी ओळख प्राप्त करून देतात.

पगडी फाळा परंपरेतून जो निधी जमतो, तो मृत व्यक्तीच्या दशक्रिया (दहावा) विधीसाठी खर्च केला जातो. अत्यंत गरजू व गरीब कुटूंबाला आर्थिक मदत मिळावा हा हेतू या परंपरेचा आहे. यातून तातडीने गावकऱ्यांकडून कुटुंबास प्राप्त होते त्यामूळे त्या कुटूंबाची चिंता मिटते. अशी परंपरा आजही टिकून असल्याचे आदिवासी भागात बघावयास मिळते.

 

                                                                                    माहिती संकलन

                                                                                    श्री. रतन शिवराम चौधरी

                                                                                    प्राथमिक शिक्षक

No comments:

Post a Comment