महत्वाची माहिती

Thursday, September 24, 2020

आदिवासी ध्वज माहिती

आदिवासी ध्वज

 


 

                ध्वज म्हणजे निशाण एखादया देशाचे, धर्माचे, राजकीय पक्षाचे, संघटना, संप्रदाय यांचे विविध आकाराचे, रंगाचे निशाण असतात. संदेशवाहक, यशाचे, अस्तित्वाचे, मानाचे, अस्मितेचे प्रतीक म्हणून ध्वजाचा उपयोग प्राचीन काळापासुन केलेला आपणास दिसून येतो. पूर्वी काठीला एखादी विशिष्ट प्रतिमा बांधून खुणेचे निशान तयार करून प्राचीन मानवसमुहांनी किंवा टोळयांनी आपआपल्या गटाची खुणचिन्हे म्हणून पशू, पक्षी, पाने-फुले, देव-देवता किंवा दैवी वस्तू यांच्या चित्रांचा उपयोग केलेला आढळतो त्यांना पताका म्हणतात.

हवेत फडफडणारे रंगीबेरंगी ध्वज प्रेरक, उत्तेजक, उत्साहवर्धक व स्वाभीमानी वातावरण तयार करतात. झेंडा, गुढी, दिंडी, ध्वज, पताका अशी नावे आढळतात. स्फुर्तीस्थान अथवा मानबिंदू म्हणून ध्वजाचा उपयोग प्राचीन काळापासून जगभर निरनिराळया जमातींनी केलेला आढळतो. आदिवासी हा मुळातच निसर्गपूजक असल्याने निसर्ग कधीही कुणाचा भेदभाव करीत नाही तसे आदिवासी देखील कुणाचाही भेदभाव करीत नाही. अशी मानव सभ्यता आदिवासी लोकांमध्ये आढळते. परंतू मुख्य प्रवाहामधील विशेष प्रगत मानवसमुहांनी आपआपले वेगळे अस्तित्व निर्माण करून निसर्गातील रंगांची तसेच धर्माच्या तत्वानुसार विविध आकाराचे, रंगाची वाटणी करून आपले वेगवेगळे झेंडे तयार करीत आहेत. त्यांच्या खांदयावर वेगवेगळया आकाराचे, रंगाचे, पक्ष, धर्म, संप्रदाय, संघटना यांचे झेंडे आदिवासींच्या हातात दिले आहेत.

देशात विविध आदिवासी जमाती मध्ये फिरत असतांना पांढऱ्या व लाल तसेच पिवळा तर काही भागात हिरवा व निळया रंगाला पसंती दिसुन येते.

भगवान बिरसा मुंडा यांच्या उलगुलानाची चेतना समाजात पेरतांना पांढऱ्या व लाल रंगाच्या वैशिष्टयानुसार ही चळवळ सुरू आहे. म्हणून हया ध्वजाचे दोन रंग मानवतेचे व स्त्री-पुरूष प्रतीक म्हणून स्विकारले आहेत.

            उदा. पुढीलप्रमाणे,

डोंगरदेव- ‘भाया ’ हया उत्सवाच्या वेळी वेळूच्या लांब काठीला पांढऱ्या रंगाचा गमछा (ध्वज) म्हणून वापरतात. चंद्राचा प्रकाश हा पांढरा शुभ्र असतो. तर उगवता सुर्य प्रकाश लाल भडक असतो. मानवाच्या शरीरात पांढऱ्या पेशी व लाल पेशी असतात, तसेच आदिवासी पुरूषाच्या डोक्यावर टोपी, पगडी, गमछा पांढऱ्या रंगाचे असते. तर स्त्रियांच्या डोक्यावर लाल रंगाची फडकी असते. स्त्री-पुरूष  दोनच जाती म्हणून प्रतीक पांढरा व लाल दोनच रंग आहेत. धान-आदिवासी हे कणी कणसरीलाच अन्नदेवता मानतात म्हणून नागलीचा (नाचणी) रंगही लालच आहे. तसेच ज्वारी, तांदळाचा रंगही पांढराच आहे. पाण्याचा बर्फ झाल्यावर पांढरा रंग तयार होतो, तर अग्णि जळतांना लाल भडक दिसतो. लाल हा रंग क्रांतीचा तर पांढरा रंग शांतीचा प्रतीक मानला जातो. आदिवासींचा मोठादेव, त्याचा एकपाती लाल व पांढऱ्या रंगात आहे. घर भरणी करतांना घरावर एकपाती पांढरे व लाल ध्वज पताका लावल्या जातात.

आदिवासी बचाव अभियानाने हया ध्वजाची निर्मीती केलेली आहे. हा ध्वज कोणत्याही पक्ष, धर्म, संप्रदाय, व्यक्ति अगर जमात समुहाचा नाही तर नवीन आदिवासी पिढीच्या चेतना जागृत करण्याचा हा एक छोटा प्रयत्न आहे जो मानवता, एकात्मता स्त्री पुरूष समानता प्रदर्शित करेल.

 

 


No comments:

Post a Comment